समाजाचा इतिहास

नवी दिल्ली इथल्या वनिता समाजाची स्थापना २ फेब्रुवारी १९५३ रोजी कमलाताई प्रधानांकडे झाली. त्यावेळच्या अवघ्या २५ सदस्यांची ही संस्था आज अनेक पटींनी वृद्धिंगत झाली आहे. आज समाजाची सदस्य संख्या साडेतीनशेपेक्षा जास्त आहे. संस्थेच्या जीवनात त्याच्या आयुष्य वाढीबरोबरच त्याची ताकद वाढते, संस्थेला स्थैर्य येते आणि त्याचे स्वरूपही व्यापक होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपला वनिता समाज असे म्हणता येईल.त्यामुळे त्याच्याबद्दलच्या अपेक्षा पण तितक्याच प्रमाणात वाढल्या आहेत.

श्रीमती विमलाताई देशमुख या समाजाच्या पहिल्या अध्यक्ष. सुरुवातीच्या कठीण परिस्थितीत समाजाची जोपासना करण्यास बरेच परिश्रम व त्रास घ्यावा लागला. आजची वास्तू १९७३ मधे बांधून झाली. त्यापूर्वी घरोघरी बैठका होत असत. काही वेळा ब्लाइंड स्कूलच्या हॉलमधेही घेतल्या जात. योजनाबध्द कार्यक्रम करण्यासाठी कायमस्वरूपी जागा पाहिजे होती आणि यावर एकच उपाय होता तो म्हणजे स्वतःची जागा घेऊन वास्तू उभारणे. त्याची सुरुवात १९६२ मधे सुशीलाबाई जोशी यांनी ‘रात्र संपली पण उजाडलं कुठे‘ या नाटकाचा प्रयोग करून अकरा हजार रुपये मिळवले. त्यात आणखी पाच हजार रुपयांची देणगी मिळवून १९६९ मधे समाजासाठी ही जागा मिळवली. २२ ऑक्टोबर १९७१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती माननीय व्ही.व्ही.गिरी यांच्या हस्ते पायाभरणी झाली. वास्तू उभारण्यासाठी एकंदर पावणेचार लाख रुपये खर्च आला. ही रक्कम जमवण्यात श्रीमती प्रभाताई गोखले, श्रीमती सुहासताई भिसे यांचा मोलाचा वाट आहे. श्रीमती विद्याताई राजे यांनी चौगुले यांचेकडून ५१ हजार रुपयांची देणगी मिळवून दिली, त्यातून पार्वतीबाई चौगुले सभागृह उपलब्ध झाले. इंजिनीअरिंगच्या सर्व कामाची जबाबदारी श्रीयुत गाडगीळ, आर्किटेक्ट श्रीयुत वरेरकर व देखरेखीची जबाबदारी श्रीयुत भिसे या सर्वांनी विनामूल्य पेलली. हितचिंतकांमधे श्रीयुत कठाळे यांची उणीव सदैव भासते.

१९७३ मधे वास्तू पूर्ण झाली. कायदा मंत्री बाळासाहेब गोखले यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन झाले. महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या राजधानीत मराठी संस्कृतीची जपणूक करून भगिनींना जणू आपल्या माहेरची आठवण करून देण्यात समाज सतत कार्यरत असतो. आपले मराठी सणवार, संस्कृती यांचे दर्शन स्थानिक कार्यक्रमांद्वारे केले जातेच, शिवाय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, नामवंत कलाकारांनी इथे हजेरी लावलेली आहे.

दिल्लीतील इतर समाजांशीही समाजाने चांगले संबंध जोडले असून एकत्र मिळूनही कार्यक्रम सादर केले जातात.

वाचनालय हे तर समाजाचे भूषण आहे. अद्ययावत वाचनालयात सुमारे पाच हजार पुस्तकं आणि नियतकालिकं आहेत. दर वर्षी महाराष्ट्र समाज बिल्डिंग ट्रस्टकडून समाजाला देणगी मिळते. सामाजिक बांधिलकी जपतांना समाजातर्फे आजूबाजूच्या परिसरातील गरीब मुलांसाठी बालवाडी चालवली जाते. यात ७० – ७५ मुले आहेत. त्यांना रोज नाश्ता, औषधं, त्यांची सहल, वैद्यकीय तपासणी, शिवाय आपले सणवारही शाळेत साजरे केले जातात. दिल्लीतल्या मराठी बांधवांसाठी उपयुक्त असणारे वधुवरसूचक मंडळ हा आमचा आणखी एक उत्तम उपक्रम आहे. आजच्या ऑनलाईन नोंदणीच्या काळातही दरवर्षी होणाऱ्या वधूवर मेळाव्याला तर केवळ दिल्लीतूनच नव्हे तर लखनौ, हरिद्वार, इंदूर इथूनही चांगला प्रतिसाद असतो.

दरवर्षी समाजातर्फे एखाद्या सामाजिक आणि उत्तम कार्य करणाऱ्या संस्थेला यथाशक्ती देणगी दिली जाते. यामध्ये महाराष्ट्रातल्या संस्थाही आहेत.

अनेक वर्षांपूर्वी लावलेल्या समाजाच्या छोट्याशा बीजाचा आज असा डेरेदार वृक्ष झालेला पाहतांना आणि शतक महोत्सवाकडे चाललेली वाटचाल पाहून खरंच कृतकृत्य वाटते.